बोअरवेलमध्ये अडकलेली मोटार बाहेर कौशल्याने काढताहेत बाहेर
पाबळ (वार्ताहर) – आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून व्यवसाय करणारे सुशिक्षित असतात, तर कष्टाची कामे करणारे अशिक्षित असतात. हाच समाज खोटा ठरवण्याचे काम एका जोडप्याने यशस्वी करून दाखवले आहे. त्या दोघांनी कष्टाच्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक व्यवसाय सुरु केला आहे तो आहे बोअरवेलमध्ये अडकलेली मोटर बाहेर काढून देण्याचा. यासाठी त्यांनी चक्क कॅमेरा आणि मॉनिटरचा चपखल उपयोग करून दाखवताना, अवजड मोटार बाहेर काढण्यासाठी, त्यातील अडथळे दूर करण्यासाठी लोखंडी साधनेही निर्माण केली आहेत. नुकतीच पाबळ येथील अप्पा पानसरे यांच्या बोअरवेलमध्ये अडकलेली मोटार त्यांनी तीन दिवसांच्या अथक परिश्रमाने काढून दिली.
ग्रामीण भागात सध्या विंधन विहिरींचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. काही वेळा अंतर्गत खनिज ढासळल्याने तर कधी खोडी काढण्याचे उद्देशाने या विंधन विहिरीच्या पाइपमध्ये दगड, माती टाकून मोटार बंद करण्याचे प्रकार घडत असतात. मात्र या प्रकारात कधी कधी नको ते प्रयोग करून मोटार काढण्याचे प्रयोग होत असतात आणि त्याचाच फटका शेतकऱ्यांना बसत असतो. अशावेळी सहज बाहेर येणारी मोटार आणखीनच खोलवर गुंतून पडत असते. अशावेळी ती मोटार गमावण्याचाही धोका होत असतो. नेमकी मोटर कोठे आहे, त्यावर दगड अथवा मातीचा थर आहे का, पाइपचा तुटलेला तुकडा आहे का हे समजत नाही. प्रयत्न वाया जात असतात.
दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील राजू राजवडे व पत्नी वनिता राजवडे या जोडप्याने याच समस्येवर उपाय काढून कॅमेरा उपयोगात आणून तब्बल दोनशे फुट खोलीवरील मोटारी काढून देण्याचे तंत्रज्ञान हस्तगत केले आहे. तीन दिवसांपूर्वी पाबळ येथील दोनशे फूट बोअरवेलमधील मोटार त्यांनी काढून दिली. कॅमेरयाच्या सहाय्याने व विशिष्ठ पद्धतीने स्वत:च बनवलेल्या लोखंडी हत्यारांच्या सहाय्याने त्यांनी मोटर काढून दिली. पन्नाशी गाठलेल्या या जोडप्याचा मुलगा समीर राजवडे दोन वर्षांपासून आपल्या मातापित्यांना मदत
करत आहे.
अशी काढली जाते मोटर
राजू राजवडे सांगतात की, मी घरच्या परिस्थितीमुळे शेती न करता, इलक्ट्रिक मोटार दुरुस्तीचे काम शिकत होतो. त्यावेळी ही समस्या माझ्या लक्षात आली. त्यात मोटार वर काढताना लागणारी चैन तयार केली. त्यानंतर बोअरवेलमध्ये अर्धवट तुटलेला अथवा घडी पडलेला पाइप आतूनच कापून बाहेर काढण्यासाठी, एक कटर तयार केला तर आतील दगड गोटे बाहेर काढण्यासाठी तीन इंच व्यासाची पक्कड तयार केली.
दगड सहज वर येण्यासाठी साखळी व पुली तयार केली मात्र हे काम डोळे असूनही आंधळ्यासारखे करावे लागायचे यासाठी पाण्यातील वस्तू दिसू शकणारा कॅमेरा व मॉनिटर घेतला. त्यासाठी टेम्पोतील बॅटरी उपयोगात आणली. आत जाऊन चित्र दाखवणारी लोखंडी यंत्रणा तयार केली. त्यामुळे मोटर व आतील वस्तू बाहेर काढता येऊ शकल्या. गेल्या वीस वर्षांत आठवड्याला किमान तीन मोटारी बाहेर काढून देत आहे. यासाठी स्वतःचा टेम्पो घेऊन गावोगाव हे काम करत आहे.