पुणे -शिवाजीनगर येथील सीओईपी ग्राऊंडवरील जम्बो कोविड रुग्णालयात आजपासून रुग्ण दाखल केले जाणार आहेत. परंतु, ‘जम्बो’मध्ये रुग्णांना थेट ऍडमिट करता येणार नाही. तर महापालिकेच्या सेंट्रल वॉररूममधूनच जम्बोमध्ये रुग्णाला दाखल करता येणार आहे.
महापालिकेच्या सेंट्रल वॉररूममधूनच जम्बोमध्ये रुग्णाला दाखल करता येणार आहे. तर, आयत्यावेळी आणि परस्पर येणाऱ्या रुग्णांना येथे ऍडमिट करून घेतले जाणार नाही. अगदी अत्यवस्थ असेल तर त्यांना कॅज्युल्टीमध्ये घेऊन, सर्व प्रक्रिया करूनच दाखल करून घेतले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यावेळी दिली.
जम्बो रुग्णालयाची हेल्पलाइन : 020-25502110
दरम्यान, सोमवारी सुरू झालेल्या जम्बो कोविड रुग्णालयामध्ये 13 रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.
सुरुवातीला अडीचशे बेडची व्यवस्था केली जाणार असून, शुक्रवारपर्यंत 500 बेडची व्यवस्था पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली. दरम्यान, येथे सोमवारी तातडीने 55 बेड सुरू करण्यात आले.
मागील वर्षी रुग्णालयात दाखल असलेल्यांची संख्या 18 ते 20 टक्के होती; आता ती 10 टक्केच आहे. बऱ्याचशा रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, तसेच अनेकजण सुरूवातीलाच डॉक्टरांकडे जात असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 2,300 बेड्स उपलब्ध आहेत, त्यातील 1,600 खासगीमध्ये तर 700 बेड सरकारी रुग्णालयात आहेत. मागीलवर्षी खासगी रुग्णालयातील सुमारे 3,500 बेड नियंत्रणाखाली आणले होते. त्यामुळे आता आणखी 1,900 बेड त्यांच्याकडून घेता येतील. निर्बंधांविषयी रोज चर्चा सुरू आहे. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसेल, तर बेशिस्तांवर कारवाईचे सर्व अधिकार पोलिसांना दिले आहेत. काही रुग्णालयांबरोबर बेड्ससंदर्भातील करार करणार आहोत. काही जणांबरोबर ते झाले आहेत.
– विक्रम कुमार, आयुक्त, मनपा