पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक आणि लिपिक- टंकलेखन या “क’ गटांच्या पदांचा निकाल गेल्या आठ महिन्यांपासून रखडला आहे. हा निकाल त्वरित जाहीर करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांतून होत आहे.
मराठी व इंग्रजी लिपिक टंकलेखनच्या 75 पदे, राज्य उत्पादन शुल्काच्या 33 पदे, तर कर सहायकच्या 126 असे एकूण 234 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात आली. या सेवेतील पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 16 जून 2019 रोजी झाली. त्यानंतर आयोगाने मुख्य परीक्षा 6 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2019 रोजी घेतली. मुख्य परीक्षा होऊन जवळपास आठ महिने झाले. त्यानंतर अद्यापही अंतिम निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे उमेदवारांतून नाराजी व्यक्त होत आहे.
लवकर निकाल प्रसिद्ध करण्याची मागणी
यासंदर्भात एमपीएससी स्टुडंटस् राइटस् या संघटनेचे महेश बडे व किरण निंभोरे यांनी रखडलेल्या निकालाकडे लक्ष वेधले. निकाल रखडल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. उमेदवारांपुढे पुढील नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे उमेदवारांचे हित लक्षात घेऊन आयोगाने लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करावा, अशी मागणी संघटनेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.