जळोची : लॉकडाउनच्या कालावधीत नागरीकांना घरात रहावे लागले. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तींकडून सोशल मीडियाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात आलेला आहे. त्यातूनच तरूण मुला-मुलींच्या फेसबुक, व्हॉटसअॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक तसेच अन्य सोशल मिडीयाच्या या वापरातून अनोळखी लोकांची ओळख होऊन त्यातून मैत्रीचे संबंध निर्माण झाले आहे.
अनोळखी मैत्री झालेल्या व्यक्तींबरोबर यातूनच भावनिकता निर्माण होऊन तरूण-तरूणींनी आपले वैयक्तिक फोटो, बॅक डाटा, सोशल मीडियाचे आयडी व पासवर्ड असे प्रायव्हसी असलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. अनोळखी मैत्री ठेवलेल्या व्यक्तीकडून फोटो, बॅक डाटा, आयडी व पासवर्ड यांचा वापर करून अश्लील फोटो तयार करून बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळणे, शारीरिक संबधाची मागणी करणे यासारखे सायबर क्राईमचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल असून त्यामधील आरोपीस अटक करण्यात आले आहे. यासंदर्भात पुढील तपास चालू आहे.
या पार्श्वभूमीवर असे प्रकार आपल्यासोबत किंवा आपल्या मुला-मुलीसोबत घडले असल्यास पालकांनी न घाबरता पुढे येऊन तात्काळ संबधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नका. सोशल मीडियाचा वापर मर्यादित व सुरक्षितपणे चांगल्या हेतूकरिता करण्यात यावा, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.