बिगरबासमती तांदळाची निर्यात घटली
पुणे – बिगरबासमती तांदळाची निर्यात भारताच्या तुलनेत इतर देशांतून वाढली आहे. त्यामुळे देशातून होणारी निर्यात 33 टक्क्यांनी घटली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात देशातून अवघी 50.35 लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली. याद्वारे अवघी 14 हजार 350 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भाव वाढल्याने डॅश, मसुरी, आयआर 64 या बिगर बासमतीची निर्यात 3 वर्षांतील निच्चांकी पातळीवर पोहोचली असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. तर, दुसरीकडे पीक चांगले आल्याने बासमती तांदळाची होणारी निर्यात मात्र टिकून आहे.
मागील वर्षी देशाच्या विविध भागांतील बिगर बासमती तांदळाचे उत्पादन अन्य देशांच्या तुलनेत खूप जास्त होते. मात्र, याकाळात जागतिक निर्यातीच्या स्पर्धेतील चीन, इंडोनेशिया, मलेशिया सारख्या देशांनी बिगर बासमतीचे भाव भारतापेक्षा कमी ठेवले. त्यातुलनेत भारताच्या बिगर बासमतीच्या तांदळाचे भाव जास्त असल्याने यावर्षी निर्यातीत मोठी घट झाली. यामध्ये कमी दराचे डॅश, मसुरी, आयआर 64 आदी तांदळाचा समावेश आहे. तर, आंबेमोहोर, कालीमुछ, इंद्रायणी हे केवळ आपल्या देशात पिकविले जातात. त्यामुळे त्याच्या निर्यातीवर परिणाम झाला नाही.