पुणे : व्यापारी ते व्यापारी खरेदी आणि पॅकिंग मालावर तोलाई आकारण्यात येऊ नये. तोलाई फक्त पुणे शहरात असून महाराष्ट्रात अन्य भागात तोलाई आकारली जात नाही. तोलणार घटक रद्द करण्यात यावा, अशी मागणी मार्केटयार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट्स चेंबरकडून करण्यात आली आहे.
याबाबत चेंबरकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यावेळी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक वजन काटा असलेल्या व्यापाऱ्यांनी तोलाई आकारण्यातून वगळण्यात यावे. कालबाह्य झालेल्या तोलाई कायद्यात बदल करण्यात यावा, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास 500 घाऊक व्यापारी आहेत व तोलणारांची संख्या 30 आहे. संबंधित तोलणार फक्त काटापट्टी घेऊन जातात त्यापेक्षा तोलणार दुसरे कोणतेच काम करत नाहीत. तोलणार हा घटक भुसार विभागातून मागे घेण्यात यावा, व्यापाऱ्यांवर पडणारा तोलाईचा नाहक भुर्दंड संपुष्टात आणावा, असे निवेदनात म्हटले आहे.