पुणे – बनावट व्यक्ती, कागदपत्रांच्या आधारे जागा खरेदी केल्याप्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. सत्येंद्रकुमार शर्मा असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावणे आणि तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
याबाबत बिहार येथील सत्येंद्रसिंह श्रीरामबचन सिंह (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. दोघेही बिहारचे असून, शेजारी राहण्यास आहेत. त्यामुळे ओळख आहे. शर्माच्या सांगण्यानुसार त्याच्या थोरला भाऊ, इतरांनी आणि फिर्यादींनी 2010 मध्ये वाघोली येथे सामुहिकरित्या जागा विकत घेतली. त्यावेळी फिर्यांदीकडून आधारकार्ड, पॅनकार्ड घेण्यात आले होते. व्यवहाराचे 40 लाख 10 हजार रुपये फिर्यादींने धनादेशने दिले होते. त्यानंतर फिर्यादींच्या परस्पर त्यांच्या पॅनकार्डवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावून 2015 मध्ये परस्पर जागा खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एफआयआरमध्ये जरी शर्माचे नाव आहे. तरी यामध्ये शर्माचा प्रत्यक्ष कोणताही रोल नाही. त्याने खरेदीखताला सही केलेली नाही. त्या खरेदी खतावरून त्याला कोणताही फायदा झालेला नाही, त्याच्या खात्याला पैसे आलेले नसून, जागेचा मालक झालेला नाही. त्यामुळे त्याला अटकपूर्व देण्याची मागणी अॅड. पुष्कर दुर्गे यांनी केली.