चाकणकर; महिलांसाठी बारा कलमी कार्यक्रम
नगर – पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना 50 टक्के संधी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत-जास्त महिलांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात देखील महिलांना उमेदवारी मिळावी असा प्रयत्न राहणार असून कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघटनापातळीवर आढावा घेण्यासाठी चाकणकर आज नगरमध्ये आल्या होत्या. नगर शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक त्यांनी घेतली. या बैठकीनंतर चाकणकर पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, कोणी कोठे गेले तरी राष्ट्रवादीची महिला संघटना मजबूत आहे. महिला प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडल्यानंतर अवघ्या बारा तासात नव्याने प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात आला. कार्यकर्ता ते पदाधिकारी आणि पदाधिकारी ते नेते होण्यास वेळ लागत नाही. कोणी कोठे केले तरी पक्षात कोठेही पोकळी निर्माण होणार नाही. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते लगेच तयार होत आहे. त्यांना संधी मिळत आहे. प्रदेश महिला राष्ट्रवादीकडून महिलांसाठी खास बारा कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात महिलांची सुरक्षा व आरोग्य यावर भर देण्यात आला असून तो कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.
विधानसभेत महिलांना संधी देण्यात येणार आहे. राज्यभर दौरा पूर्ण झाल्यानंतर ज्या मतदारसंघात महिला सक्षम उमेदवार आहे. त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जाणार आहे. मी देखील खडकवासला मतदारसंघातून इच्छूक आहे. त्याप्रमाणे महिला जिल्हाध्यक्ष गुंड यांना कर्जत- जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षितेकडे लक्ष द्यावे, आज महिलांवर अन्याय व अत्याचार वाढले आहे. काल औरंगाबादमध्ये युवतीवर सामुहिक अत्याचार झाले. आरोपी अद्यापही अटक झाले नाही. यावर काही करा असे आवाहन केल्याचे सांगून चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादीला कोणी गेल्याने काहीच फरक पडलेला नाही. सत्तेचे लोणी चाखण्यासाठी या मंडळींनी पक्षांतर केले आहे. पण त्यातून अनेक कार्यकर्त्यांना आता संधी मिळणार आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्य राजश्री घुले, युवती जिल्हाध्यक्ष संध्या सोनवणे, डॉ. मेघा कांबळे आदी उपस्थित होते.