चारही निविदा रद्द करण्याची शिफारस
पुणे – महापालिकेकडून जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी काढलेल्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या चारही निविदा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निविदांची छाननी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सात सदस्यांच्या तांत्रिक छाननी समितीने आपला अहवाल तयार केला असून निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्रामुख्याने प्रकल्प उभारणीचा खर्च आणि तो चालविण्याबरोबरच त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चात निविदाधारकांनी महापालिकेने शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या माहितीवरून निश्चित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च येत असल्याने समितीकडून ही शिफारस करण्यात आली आहे.
मुळा-मुठा नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेकडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत शहरातील दोन्ही नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुमारे 990 कोटी रुपये खर्चून ही योजना साकारण्यात येणार आहे. त्यासाठी 2027 पर्यंतच्या लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून 11 ठिकाणी नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मुंढवा येथे 20 एमएलडी क्षमतेचे मत्यबीज सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, भैरोबानाला येथे 75 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, नायडू हॉस्पीटल येथे अस्तित्त्वातील सांडपाणी केंद्राची क्षमता वाढवून 127 एलएलडी क्षमतेचे तसेच नरवीर तानाजीवाडी आणि धानोरे येथी अनुक्रमे 15 आणि 33 एमएलडी क्षमतेची केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या सर्व कामांसाठी प्रत्येकी 2 कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात महापालिकेने निश्चित केलेल्या प्रकल्प बांधणीचा खर्च आणि प्रकल्प चालविण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्च निविदाधारकांकडून भरण्यात आला आहे.
महापालिकेने निश्चित केलेल्या खर्चापेक्षा सुमारे 30 ते 60 टक्के अधिक आला आहे. त्यामुळे या निविदांच्या खर्चाच्या तांत्रिक छाननीसाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने सात अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने महापालिकेकडून शहरात बांधण्यात आलेले या पूर्वीचे सांडपाणी प्रकल्प तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अभ्यास केला असता या निविदा जादा दराने आल्याने या समितीने सर्वच्या सर्व निविदा रद्द करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. हा अहवाल महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.