माझ्यावरील आरोप खोटे; त्यांचा “बोलविता धनी’ वेगळा – धर
पिंपरी – महापालिकेला मास्क पुरवठा करणारी पुरवठाधारक कंपनी एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळावर नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नातेवाईक आहेत. आपल्या नातेवाईकांमार्फत ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी बुधवारी (दि. 10) आयोजित पत्रकार परिषदेत केला. मात्र, हा आरोप नगरसेविका सुलक्षणा धर यांनी फेटाळला आहे.
शहरातील गरजू, झोपडपट्टी व कन्टेन्मेंट झोनमधील रहिवाशांना वाटप करण्यासाठी दहा लाख कापडी मास्क खरेदी करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत 12 पुरवठाधारकांनी सहभाग घेतला होता. महापालिकेने या पुरवठाधारकांना मास्क पुरविण्याचे काम विभागून दिले. त्यापैकी लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दहा लाख रुपये किंमतीचे एक लाख नग कापडी मास्क महापालिकेला पुरविले आहेत.
एडीसन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदेसोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता कंपनीचे संचालक म्हणून राजू धर, राजरत्न शिलवंत आणि शिलरत्न शिलवंत या तिघांचा उल्लेख आढळत असल्याचे ननावरे यांनी म्हटले आहे. राजू धर हे सुलक्षणा धर यांचे पती आहेत. तर, राजरत्न शिलवंत आणि शिलरत्न शिलवंत हे दोघे नगरसेविका धर यांचे बंधू आहेत.
सुलक्षणा धर यांनी आपल्या नातेवाईकांमार्फत ठेकेदारीच्या माध्यमातून आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या रकमेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार यातून घडलेला आहे. तसेच, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी तयार केलेल्या व प्रचलित कायद्यानुसार त्यांच्याविरूद्ध 7 दिवसांच्या आत कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे.
तसेच, चौकशी होईपर्यंत त्यांना महापालिकेचे कोणतेही लाभ घेण्यास बंदी आणावी, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केली आहे. तसेच, आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे देखील त्यांनी याबाबत पत्र दिले आहे. नगरसेविका सुलक्षणा धर यांच्याविरूद्ध कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल. तसेच, वेळप्रसंगी याविरूद्ध न्यायालयात धाव घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत धर म्हणाल्या, ननावरे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. ते मला मान्य नाही. मला कोणताच आर्थिक फायदा झालेला नाही. या आरोपांमागे त्यांचा हेतू काय आहे, हे मला माहीत नाही. त्यांच्यामागे “बोलविता धनी’ हा वेगळाच आहे. याबाबत त्यांनी जिथे तक्रार दिली असेल त्यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर त्याबाबत योग्य खुलासा करण्यात येईल.
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत अद्याप माझ्याकडे तक्रार अर्ज आलेला नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांना अहवाल सादर करण्यात येईल. तसेच, माजी नगरसेवक ननावरे यांनी केलेल्या आरोपातील तथ्य तपासले जाईल.
– राजेश पाटील, आयुक्त