नवी दिल्ली : ॲशेस मालिकेच्या आधीपासून खेळवली जाणारी ऑटी करंडक स्पर्धेचे पुनरुज्जीवन होणार आहे. जगातील सर्वात जुनी क्रिकेट मालिका म्हणून ॲशेसकडे पाहिले जाते. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाते. पण ॲशेस मालिकेच्या आधीपासून खेळवली जाणारी ही ऑटी करंडक स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे.
ही स्पर्धा यंदापासून कॅनडा व अमेरिका क्रिकेट मंडळ आयोजित करणार आहे. या दोन्ही देशांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ऑटी करंडक स्पर्धेचे प्रथम आयोजन 1844 साली करण्यात आले होते. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली मालिका होती. याचा अर्थ ॲशेस मालिकेच्या आधी याचे आयोजन झाले होते.
ऑटी स्पर्धेची पहिली लढत दोन दिवसांची झाली होती. पण आता कॅनडा आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असलेले संघ राहिले नाहीत. 2011 साली ही स्पर्धा पुन्हा सुरू झाली. तेव्हापासून ही स्पर्धा वेगवेगळ्या निकषांनुसार खेळवली जात होती.
या वर्षी होणारी ऑटी स्पर्धा एकदिवसीय सामन्यांची खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा कॅनडामध्ये 26 ते 30 जुलै या कालावधीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. कॅनडामध्ये आयसीसीच्या पुरुष टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे सामने 17 ते 23 जुलै या काळात होतील.
ऑटी करंडक स्पर्धेपासून कॅनडा आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक लीग सीरीजसाठी तर अमेरिका आयसीसी वर्ल्डकप लीग 2 सीरीजसाठी तयारी करेल, अशी माहिती अमेरिका क्रिकेट मंडळाचे संचालक पराग मराठे यांनी दिली.