Canada Surrey Shooting : कॅनडातील सरे येथे एका हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी पुजाऱ्याच्या घरावर 14 राऊंड गोळीबार केला असल्याचे स्थानिक माध्यमांनी माहिती दिली आहे. दरम्यान, दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची सरे येथील गुरुद्वाराजवळ हत्या करण्यात आली होती. त्याच शहरात ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॅनडातील स्थानिक माध्यमानुसार, गुरुवारी कॅनडातील सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर संशयित खलिस्तानी कट्टरपंथीयांनी गोळीबार केला. 80 अव्हेन्यूच्या 14900 ब्लॉकमध्ये सकाळी 8.03 च्या सुमारास ही घटना घडली. सरे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) च्या निवेदनानुसार, ज्या निवासस्थानावर गोळीबार झाला ते निवासस्थान लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या मोठ्या मुलाचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अतिशय गंभीर होता, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (आरसीएमपी) घटनास्थळी कसून तपास केला. यावेळी पोलिसांनी पुरावे तपासले आणि साक्षीदारांशी चर्चा केली. पोलिस सध्या हल्लेखोर आणि हल्ल्यामागील हेतू शोधण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिरावर यापूर्वीही हल्ला झाला होता. एका वृत्तानुसार खलिस्तानींनी मंदिराला तीन वेळा लक्ष्य केले आहे.
याच शहरात हरदीपसिंग निज्जरची हत्या
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची गुरुद्वाराजवळ हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. 18 जूनच्या संध्याकाळी गुरुद्वाराच्या आवारातच दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येबाबत कॅनडाने भारताकडे बोट दाखवले, तरीही ट्रूडो सरकार आजपर्यंत कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत.