– अक्षय भुजबळ
पुणे : स्मार्टफोन्सचा वापर वाढल्यामुळे सगळीकडे सोशल मीडियाचा बोलबाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लींकडीन, स्नॅपचॅट, व्हाट्सअप यासारखे असंख्य ॲप सोशल मीडियावर असताना यांच्यात आता एका नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. थ्रेड्स असं या नव्या पाहुण्याचं नाव असून मार्क जकरबर्ग यांच्या मेटाने हे ॲप लाँच केले आहे.
मेटाकडे सध्या जगभर फेमस असणाऱ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी देखील आहे. या दोन्ही ॲपची थेट ट्विटरची स्पर्धा होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये ट्विटरमध्ये सुरू असलेल्या बदलांमुळे युजर्स चांगलेच चिडून होते. हेच टायमिंग हेरून नेटाने थ्रेड्स लाँच केले.
थ्रेड्स लाँच होताच पहिल्या काही तासांमध्येच याचे तीन कोटींहून अधिक युजर झाले. थ्रेड्सची थेट टक्कर ट्विटर सोबत असल्यामुळे पहिल्याच दिवशी नेटकऱ्यांनी याचं बारसं करत ‘ट्विटर किलर’ असं टोपण नाव या ॲपला दिलं. ट्विटर प्रमाणे कार्यप्रणाली असलेले हे ॲप सध्या ट्विटरमुळे परेशान असलेल्या युजरसाठी पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. थ्रेड्समध्ये एखादं थ्रेड अर्थात पोस्ट करण्यासाठी पाचशे शब्दांची मर्यादा देण्यात आली आहे, तर एका मिनिटापर्यंतचा व्हिडिओ यामध्ये पोस्ट केला जाऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे इंटरलिंकिंग आणि दहा फोटोपर्यंतची पोस्ट एकावेळी यामध्ये करता येणार आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मधला मार्ग म्हणून देखील अनेक युजर्स याकडे पाहत आहेत. सध्या फेसबुक आणि इन्स्टावर युजरचा भडिमार असल्याने अनेक जण मोजक्या शब्दात आपल्या गोष्टी सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. अशाच मोजक्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय शब्दांचे बंधन असल्यामुळे फापट पसारा करणारे युजर्स याकडे फिरणार नाहीत.
थ्रेड्स फायदेशीर आहे का ?
इंस्टाग्रामचे लॉगिन डिटेल्स वापरून थ्रेड्स वापरता येऊ शकते त्यामुळे इंस्टाचे बरेचसे युजर्स या नव्या पर्यायाशी सहजतेने जुळून घेताना दिसतात. यासोबत ट्विटरवर नाराज असलेला व्यक्ती या ठिकाणी सहज स्विच होऊन जातो. त्यामुळे मोजक्या शब्दात क्लासिफाईड पोस्ट करणाऱ्यांसाठी हे नक्कीच चांगलं माध्यम ठरणार आहे. शिवाय लॉगिनसाठी वेगळ्या आयडीची गरज न भासता इन्स्टावरील आयडी चालत असल्याने अनेकजण याकडे सहजतेने वळताहेत. याशिवाय तुमच्या इंस्टाग्रामला अधिकृत टीक असेल तर ती तुम्हाला थ्रेड्सवर प्राप्त होते. थ्रेड्सचा इंटरफेस ट्विटर प्रमाणे असल्यामुळे अनेकांना युज टू होण्यास मदत होताना दिसत आहे. थ्रेड्स लाँच होताच त्याच्या युजरची आकडेवारी कोटींच्या घरात गेली ही सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याची पहिलीच वेळ आहे.
थ्रेड्सवर या गोष्टी नाहीत
फेसबुक आणि इन्स्टावरील युजर्स थ्रेड्सवर काही गोष्टींना नक्कीच मिस करणार आहेत. थ्रेड्स हे सध्या नवीन असल्यामुळे पहिल्या काही महिन्यांमध्ये त्यामध्ये बक्स येणं साहजिक आहे. तसे इंटीमेशन मेटाने लाँचवेळी देखील दिले होते. त्यानुसार इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्याप्रमाणे कीवर्डस आणि सर्च चा पर्याय असतो जेणेकरून सुरू असलेला एखादा लाईव्ह कार्यक्रम कोणालाही सर्च करता येऊ शकतो, असा पर्याय सध्या तरी थ्रेड्सवर उपलब्ध असल्याचे दिसत नाही. हॅशटॅग टाकता येतात मात्र सर्च चा पर्याय सुरुवातीला तरी देण्यात आलेला नसल्यामुळे युजर्सला अडचण निर्माण होऊ शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर सोशल मीडियामध्ये आणि थ्रेड्समध्ये एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळतो. तो म्हणजे इतर सोशल मीडियावरील युजर्स अनेकांना थेटपणे मेसेज करू शकतात; मात्र थ्रेड्सवर तसा पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. म्हणजेच केवळ चॅटिंगच्या उद्देशाने या ठिकाणी आलेल्यांची नाराजी होऊ शकते. यासह तुम्ही जर इन्स्टावरून लॉगिन केलं तर तुम्हाला सर्व फ्रेंडलिस्ट थ्रेड्सवर दिसते. परंतु या ठिकाणी तुम्हाला तुमचे युजर नेम बदलण्याचा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे इन्स्टावर जे युजरनेम असेल तेच युजरनेम तुम्हाला थ्रेडसवर कॅरी करावे लागणार आहे. यासह थ्रेड्सची वेब आवृत्ती नसल्यामुळे लॉगिनसाठी ॲप डाऊनलोड करणे हा एक मात्र पर्याय सध्या उपलब्ध आहे.
मॉनिटायझेशन आणि अर्निंगच काय?
सर्व काही ठीक आहे पण महत्त्वाचा प्रश्न उरतो तो सर्वसामान्यांच्या कमाईचा. थ्रेड्सच्या मॉनिटायझेशन बाबत सध्या तरी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. असं असलं तरी कमाईची दार या ठिकाणी बंद आहेत असं म्हणता येणार नाही. कारण इंस्टाग्रामवर ज्याप्रमाणे मॉनिटायझेशन नसताना अनेकांनी केवळ फॉलोवर्सच्या माध्यमातून कमाईला सुरुवात केली होती अगदी त्याचप्रमाणे थ्रेड्सवर गर्दी वाढली तर या ठिकाणी देखील कमाईचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मात्र सध्या अधिकृतपणे थ्रेड्सने मॉनिटायझेशन किंवा जाहिरातीबाबत कोणतीही माहिती समोर आणलेली नाही.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सोशल मीडियामधील ट्विटरची स्पेस भरून काढण्यासाठी मेटाने घाईघाईने का होईना हे टायमिंग साधलं. मात्र थ्रेड्स कडून आणखी काहीतरी भन्नाट मिळण्याची अपेक्षा युजरला आहे. कदाचित पुढील काही अपडेट्समध्ये त्याबाबतचे चित्र देखील स्पष्ट होईल. तूर्तास तरी सोशल मीडियावरील या नव्या पाहुण्याचं जल्लोषात स्वागत नेटकर्यानी केलं आहे. आता हा पाहुणा केवळ चार दिवसांसाठी राहणार की नेटकऱ्यांच्या सोशल मीडिया लाईफ मधील एक सदस्य होणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.