बंगळूर -कर्नाटकमधील नव्या मंत्रिमंडळाची रचना आणि खातेवाटपावरून सत्तारूढ भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. एका मंत्र्याने तर खातेवाटपावरून तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इरादा जाहीर केला. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मनधरणी केल्यानंतर संबंधित मंत्र्याने राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला.
कर्नाटकमध्ये नुकताच नेतृत्व
बी.एस.येडियुरप्पा यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून बोम्मई यांची वर्णी लागली. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना करताना अनेक जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली. तर, अनेक इच्छुकांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.
आता मनासारखे न घडल्याने अनेक जण नाराजी उघड करू लागले आहेत. त्यामध्ये मंत्री आनंद सिंह यांचाही समावेश आहे. येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सिंह यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान मिळाले. मात्र, हवे ते खाते न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.
त्यांना मागचेच वन खाते हवे होते. मात्र, यावेळी त्यांना पर्यटन आणि पर्यावरण खाती देण्यात आली. त्यांनी नाराजीपोटी थेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे सूतोवाच केले. एवढेच नव्हे तर, त्यांनी त्यांचे आमदार कार्यालयही बंद केले. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला.