- करोना काळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे
पिंपरी – करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत नागरिकांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये प्राधिकरण हद्दीत अनधिकृत बांधकामे केल्याचे निदर्शनास आले आहे. प्राधिकरण संपादित क्षेत्रात नव्याने झालेल्या काही अनधिकृत बांधकामांना प्राधिकरण प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. तसेच, सप्टेंबर अखेर या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.
देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू झाला. सुरवातीच्या काळात हा लॉकडाऊन कडक होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करण्यास सुरवात केली. प्रामुख्याने वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव, काळेवाडी आदी भागांमध्ये नव्याने अनधिकृत बांधकामे करण्यात आली.
प्राधिकरण संपादित क्षेत्रावर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची माहिती गोळा करण्यासाठी फिरत्या पथकांकडून सर्वेक्षण केले जात आहे. फिरत्या पथकाला जी बांधकामे अनधिकृत आढळली त्यांना कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, वाल्हेकरवाडीतील तीन निवासी अनधिकृत बांधकामांना प्राधिकरण प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.
बांधकाम पाडण्याचा खर्च करणार वसूल
अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी येणारा खर्च बांधकाम करणाऱ्या व्यक्तींकडून प्राधिकरण प्रशासनाने वसूल केलेला नाही. मात्र, अशा प्रकारचे मोठे अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याकडून हा खर्च वसूल केला जाईल, असे प्राधिकरणाच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार
यांनी सांगितले.
प्राधिकरण हद्दीत गेल्या काही महिन्यांमध्ये नव्याने झालेल्या अनधिकृत बांधकामांचे फिरत्या पथकामार्फत सर्वेक्षण केले जात आहे. जी बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळत आहेत त्यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याशिवाय, कागदोपत्री पुरावे सादर करण्याबाबत सांगितले आहे. फिरत्या पथकाकडून सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे थांबविण्याची
कार्यवाही केली जात आहे. पोलीसांचा बंदोबस्त मिळाल्यानंतर सप्टेंबर अखेर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन आहे.
– मनीषा कुंभार, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण.