नांदेड – नांदेड शहरातील गीता नगर येथील व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. संजय बियाणी असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. गोळीबारानंतर बियाणी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बियाणी हे गीता नगर परिसरात आपली गाडी घरासमोर लावत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बियाणी यांच्यावर तब्बल बारा गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. घटनेनंतर गीता नगर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बियाणी हे नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील मूळ रहिवाशी होते. काही दशकापूर्वी ते नांदेड येथे राहण्यास आले व येथेच कायम स्थायिक झाले. संजय बियाणी हे नांदेडमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. नांदेड जिल्ह्यात राज मॉल, बियाणी अपार्टमेंट, राज हाईट्स, गोदावरी हाईट्स नावाने नांदेड शहरात व जिल्ह्यात हजारो अपार्टमेंट व मॉल्स नावाने त्यांचे उद्योग आहेत. तर बियाणी अपार्टमेंट ,राज अपार्टमेंट नावाने शहरातील अनेक भागात रहिवाशी वस्त्यांसाठी त्यांनी घरांची निर्मिती केली आहे.
वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान गतवर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्यात त्यांच्या कार्यालयात घुसून एका कुप्रसिद्ध गुंडाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा मोठ्या शिताफीने बियाणी यांनी मी तो नसल्याचे सांगून हल्ला परतवून लावला होता. दरम्यान आज सकाळी बियाणी यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास नांदेड पोलिस करत आहेत.