मुंबई -आयपीएल स्पर्धेतील सोमवारी झालेल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान याच्या भेदकतेसमोर सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव झाला. एकवेळ रोमहर्षक होणार असे वाटत असणारा हा सामना लखनौने सहज जिंकला. आवेश खानने 4 गडी बाद करत हैदराबादचा डाव 20 षटकांत 9 बाद 157 धावांवर रोखला.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरुवातच खराब झाली. प्रमुख फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 30 चेंडूत 5 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 44 धावांची खेळी केली. त्यानंतर निकोलस पूरनने 24 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावताना 34 धावा करत विजयासाठी प्रयत्न केले.
मात्र, तो बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदरच्या 18 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना अपयश आले व सामना त्यांच्या हातातून निसटला. आवेश खानने हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनसह प्रमुख फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. लखनौकडून आवेश खानने सर्वाधिक 4 गडी बाद केले. जेसन होल्डरने 3 तर कृणाल पंड्याने 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, कर्णधार लोकेश राहुल, दीपक हुडा यांची अर्धशतकी खेळी व त्याला सुरेख साथ देत आयुष बदोनीने केलेली आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेच्या सोमवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 170 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून लखनौला पहिल्यांदा फलंदाजी दिली. क्वांटन डीकॉक 1, इवान लेविस 1 व मनीष पांडे 11 यांनी साफ निराशा केली. एका बाजूने कर्णधार राहुल खेळपट्टीवर टिच्चून उभा होता. त्याला साथ देण्यासाठी दीपक हुडा खेळपट्टीवर आला व या दोघांनी संघाचा डाव सावरला. राहुलने आपले संयमी अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 50 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 68 धावा करुन बाद झाला. हुडादेखील 33 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार फटकावून 51 धावा करुन परतला.
राहुलला टी. नटराजनने त्याला पायचीत केले. त्यानंतर कृणाल पंड्याने नटराजनच्या या षटकांत 3 चेंडूत 1 चौकार फटकावून 6 धावा केल्या. मात्र, त्यालाही नटराजनने त्रिफळाबाद केले. त्याचवेळी भरात असलेल्या आयुष बदोनीने 12 चेंडूत आक्रमक 3 चौकारांसह 19 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला 20 षटकांत 7 बाद 169 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बदोनी धावबाद झाला. हैदराबादकडून टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर व रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स – 20 षटकांत 7 बाद 169 धावा. (लोकेश राहुल 68, दीपक हुडा 51, आयुष बदोनी 19, टी. नटराजन 2-26, वॉशिंग्टन सुंदर 2-28, रोमारियो शेफर्ड 2-42). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 9 बाद 157 धावा. (राहुल त्रिपाठी 44, निकोलस पूरन 33, वॉशिंग्टन सुंदर 18, आवेश खान 4-24, जेसन होल्डर 3-34, कृणाल पंड्या 2-27).