नवी दिल्ली -केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तुटपुंज्या निधीवर सध्या साईचे (भारतीय क्रीडा प्राधिकरण) पुरुष व महिला कुस्तीपटूंचे सराव शिबिर सोनिपत येथे सुरु आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिक, राष्ट्रकुल व आशियाई तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू या शीबीरात सराव करत असूनही सरकारकडून अत्यंत कमी निधी मिळाला आहे.
पुरुषांच्या कुस्ती शिबिरासाठी 2.30 कोटी रुपये आणि साई लखनौत सुरु असलेल्या महिलांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी 1.43 कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या खर्चामध्ये प्रवास, निवास, बोर्डिंग, भोजन, क्रीडा साहित्य, विमा आणि प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा समावेश आहे. म्हणजेच हा निधी केवळ खेळाडूंवर खर्च करण्यासाठी नाही तर प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफच्या मानधनासाठीही असल्याने सध्या या शिबिराच्या आयोजकांवर कडाडून टीका सुरु आहे.
साईच्या सोनिपत आणि लखनौ येथील केंद्रांमध्ये आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंसाठी 91 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात फ्रीस्टाईल आणि ग्रीको-रोमन प्रकारातील एकूण 124 कुस्तीपटू, 23 प्रशिक्षक आणि सहायक कर्मचारी यांच्यासह एकूण 147 शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. या शिबीरातऑलिम्पिक पदकविजेते रवी कुमार दहिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, अंशू मलिक व विनेश फोगट हे खेळाडू सहभागी झाले आहेत.