नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे, मांडवे, मुथाळण व जांभुळशी या गावांतील विविध वाड्या-वस्त्यांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजी फ्री फॅब्रिकेटेड मेटलिक टॅंक बांधण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू होण्याआधीच डोंगरी भागातील गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कोपरे येथील ठोंगिरेवाडी येथे जर्मन तंत्रज्ञान वापरून 3 लाख लिटर क्षमतेची फ्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टॅंक बांधण्यात आली आहे. याच धर्तीवर कोपरे येथील कुडळवस्ती, हगवणेवस्ती व काठेवाडी तर मांडवे येथील गुडघ्याचीवाडी, शेलाचा माळ, जोशीवाडी येथे प्रत्येकी एक लाख लिटर्स आणि जांभुळशी व मुथाळणे या दोन्ही गावठाण येथे प्रत्येकी तीन लाख लिटर क्षमतेच्या जर्मन टेक्नॉलॉजी फ्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टॅंक बांधण्याची मागणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याकडे केली होती.
डॉ. कोल्हे यांनी आमले यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन आयुष प्रसाद यांना पत्र पाठवून शिवकालीन टाक्यांच्या तुलनेत हे तंत्रज्ञान चांगले असून पाणी शुद्ध राहण्यासाठी जर्मन तंत्रज्ञानात स्वयंचलित यंत्रणा असल्याने पाणी खराब होण्याचे प्रकार घडत नाहीत. याकडे प्रसाद यांचे लक्ष वेधले आहे. ही योजना राबविल्यास चारही गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल, असे सांगून डॉ. कोल्हे यांनी जलस्वराज्य टप्पा 2 च्या धर्तीवर चारही गावांतील वाड्या-वस्त्यांवर मेटॅलिक टॅंक बांधण्याची मागणी केली.