पिंपरी – दाजीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून होणारी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हण्याने कोयत्याने वार करून बहिणीच्या पतीचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. 9) रात्री भोसरी परिसरात घडली.
मोहन बाबुराव लेवडे (वय 45) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मयताची पत्नी नंदा मोहन लेवडे (वय 34) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विष्णू मुंजाजी जगाडे (वय 30) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू हा फिर्यादी नंदा यांचा भाऊ आहे. नंदाचे पती मयत मोहन यांचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असा संशय विष्णूला होता. नंदा आणि मोहन यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती. बाहेर असलेल्या अनैतिक संबंधामुळे ही भांडणे होत असल्याचा संशय विष्णूला होता. त्यामुळे ही भांडणे सोडविण्यासाठी विष्णू मागील काही दिवसांपूर्वी बहीण नंदा यांच्या घरी आला होता. रविवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर विष्णू आणि मोहन यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. त्यातून चिढलेल्या विष्णूने लोखंडी कोयत्याने वार करत मोहन यांचा खून केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. विष्णू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.