नवी दिल्ली – हौथी बंडखोरांनी हल्ला केलेल्या ब्रिटीश तेलवाहू टँकरला भारतीय नौदलाने मदत केली आणि जहाजाला लागलेली आग वेळीच विझवली आहे. एडनच्या आखातामध्ये चाचेगिरीला आळा घालण्यासाठी तैनात असलेल्या आयएनएस विशाखापट्टणमवरील कर्मचार् यांनी ही मदत केली.
एमव्ही मार्लिन लॉन्डा या ब्रिटनच्या तेलवाहू टँकरवर हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागल्यामुळे या जहाजाला आग लागली होती. हा हल्ला लाल समुद्रातून बाहेर पडत असताना झाला होता.
या तेलाच्या टँकरवर भारताचे २२ आणि बांगलादेशचा एक कर्मचारी नियुक्त होता. या जहाजाने मदतीचे आवाहन केल्यावर आयएनएस विशाखापट्टणमने अग्निशामक उपकरणांसह मदत कर्मचार् यांचे पथक घटनास्थळी रवाना केला होते, असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
व्यापारी नौका आणि कर्मचार् यांच्या सुरक्षसाठी भारतीय नौदल कटिबद्ध आहे. हे एमव्ही मर्लिन लॉन्डा या तेलवाहू जहाजाला केलेल्या मदतीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असेही नौदलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
एडनच्या आखातामध्ये आणि लाल समुद्रामध्ये हौथी बंडखोरांनी हल्ले वाढवल्यापासून भारतीय नौदलाने या सागरी मार्गामध्ये गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एमव्ही गेंको पिकार्डी या नौकेवर ड्रोन हल्ला झाला होता, तसेच ५ जानेवारीला एमव्ही नॉर्फ्लॉक या जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्नही हौथी चाच्यांकडून झाला होता. तेंव्हाही भारतीय नौदलाच्या जहाजांनी मोलाची मदत केली होती.