सातारा – न्यायालयाने तक्रारदाराच्या विरोधात काढलेल्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणारा सातारा तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार विश्वनाथ दत्तात्रय सपकाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हा काही वर्षांपूर्वी एका अपघाताच्या खटल्यात संशयिताला जामीन राहिला होता. त्या खटल्याची सुनाणी सुरू झाल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने जामिनासाठी तारण दिलेली संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयाने वॉरंट काढले होते.
ते वॉरंट न बजावता त्यात तक्रारदाराला मदत करण्यासाठी हवालदार सपकाळ याने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार नोंदवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी करून सपकाळ याला लाच घेताना रंगेहाथ पडकण्यासाठी सोमवारी राजवाडा परिसरात एका हॉटेलमध्ये सापळा लावला होता.
या हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार सपकाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सपकाळ याला पुढील चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. सपकाळ याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे साताऱ्याचे उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश वायदंडे, मारुती अडागळे यांनी ही कारवाई केली.