सातारा – भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी विक्रम पावसकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश हाळवणकर यांनी सोमवारी ही निवड जाहीर केली.
पहिल्या टप्प्यात कार्यकारिणीने जिल्ह्यातील सोळा मंडलप्रमुखांची निवड केली होती. त्यांचा सत्कार प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. हा सत्कार सोहळा सुरू असतानाच सुरेश हाळवणकर यांनी विक्रम पावसकर यांच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवडीची घोषणा केली. भाजप जिल्हा कार्यकारिणी व सातारा मंडल समिती यांच्यावतीने पावसकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
पावसकर यांच्या फेरनिवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी कराडमध्ये जल्लोष केला. जिल्हाध्यक्ष म्हणून पावसकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याचे संकेत सुरुवातीपासूनच होते. भाजपने मंडलप्रमुख निवडीत साताऱ्यातील राजे गट पूर्णपणे बाजूला ठेवला होता. पक्षबांधणीत पावसकरांचे अधिक योगदान असल्याने त्यांच्या फेरनिवडीच्या
हालचाली सुरू झाल्या होत्या. पावसकर हे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या निकटचे असल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीला गेल्या पाच वर्षात बरेच धक्के दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात भाजपचे सात जिल्हा परिषद सदस्य, तीन नगराध्यक्ष, 32 पंचायत समिती सदस्य असून 21 हून अधिक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या होत्या. जिल्ह्यात भाजपने आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत.
त्यासाठी पावसकर यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपले राजकीय कौशल्य पणाला लावले होते. 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पावसकर यांना लगेचच जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. बूथ बांधणी, सक्रिय सदस्य नोंदणी यामध्ये पावसकरांनी चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यात भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे तीन लाख 40 हजार सदस्य, 2900 बूथ, 2200 बूथ समन्वयक केल्याने भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यात यश मिळवले होते. या कामगिरीचा विचार करूनच पावसकर यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाचे “गिफ्ट’ देण्यात आले असून पक्षात त्यांचा दबदबा वाढला आहे.