पुणे – करोनोत्तर काळात हवेची गुणवत्ता हा एक महत्वाचा घटक असणार आहे. जास्त काळ प्रदूषित हवेशी संपर्क आल्यास नागरिकांना श्वसनाशी संबंधित अनेक विकारांचा सामना करावा लागणार असल्याची भिती पर्यावरण आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढील काळात शहरातील हवेची गुणवत्ता चांगली कशी राहील, यासाठी प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
व्यक्तीच्या श्वसन संस्थेवर थेट परिणाम करणारा करोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, करोनातून बरे झाल्यानंतरही आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
यामध्ये हवेची गुणवत्ता हा देखील एक महत्त्वाचा घटक असणार आहे. करोना संसर्गामुळे रुग्णांची श्वसनसंस्था प्रभावित होते. या संसर्गातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही श्वसनसंस्था पूर्वीच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात कमकुवत होते, अशा स्थितीत प्रदूषित हवेशी जास्त काळ संपर्क आल्याने संबंधित व्यक्तीला श्वसनाचे विविध विकार होण्याची भिती आहे.
यामध्ये श्वास घेण्यास अडचण होणे, विविध ऍलर्जी, संसर्ग तर अधिक गंभीर प्रकारामध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
काही शहरांतील हवेची गुणवत्ता : (प्रति घनमीटर) :
दिल्ली : 48 ,
पुणे : 40 ,
मुंबई : 97 ,
अहमदाबाद : 97