कोलोंबो, (श्रीलंका) – श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील एमटी न्यू डायमंड या तेलवाहू जहाजाला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. भारतीय नौदलाच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.
या जहाजाला आग लागल्यानंतर ही आग विझवण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस सह्याद्री या जहाजाला रवाना करण्यात आले आहे. तसेच काही हेलिकॉप्टर आणि विमानांची मदतही ही आग आटोक्यात आणण्यासाठी घेतली गेली असल्याचे नौदलाच्यावतीने करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
3 सप्टेंबरला इंजिनामध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेली ही आग विझवण्यासाठी नौदलाच्या आग प्रतिबंधक तज्ञांनाही रवाना करण्यात आले होते. तसेच भारतीय तटरक्षक दलाची 6 जहाजे आणि दोन अग्निरोधक विमानेही या कामगिरीवर होती.
जहाजातून होणाऱ्या संभाव्य तेलगळतीमुळे समुद्रात प्रदुषण होऊ नये यासाठी तज्ञांचे एक पथकही गेल्या दोन दिवसांपासून कार्यरत होते. या जहाजावरील 23 खलाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. या जहाजावरील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
या जहाजावर 333 मीटर लांबीच्या तेलाच्या टॅंकरमधून 3 लाख मेट्रीक टन क्रूड तेल कुवैत येथून आणले जात असताना ही आग लागली.