पुणे – भाजपचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला. मात्र असे असतानाच पुण्यात निर्लज्जपणाचा कळस पाहायला मिळाला होता.
गिरीश बापट यांचे निधन होऊन अवघे तीन दिवस झाले असतानाच पुण्यात भावी खासदाराचे बॅनर झळकले. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे पुण्यात ‘भावी खासदार’ असा उल्लेख असणारे बॅनर लागले होते. मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त यानिमित्त हे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र यावरून मुळीक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली गेली.
दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून उमेदवार कोण असणार? याबाबत उलट सुलट चर्चा पुण्यात सुरू आहे. अश्यातच आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना पुणे लोकसभा पोटनिवडणूक उमेदवार कोण असणार? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिल्याचं दिसून आलं. यावेळी ते म्हणाले, “पुणे लोकसभेबाबत तूर्तास मी चर्चा घडवणार नाही, तुम्ही ही घडवू नका. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे कुटुंबीय अद्याप दुःखातुन सावरलेलं नाही. त्यामुळं पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही चर्चा करू नका. मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही’. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी तूर्तास या प्रकरणाला पूर्णविराम दिला असल्याचं पाहायला मिळत आहे.