पाचगणी – जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा शहरातील मुख्य बाजारपेठेत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी दुपारी शेतकरी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी आमदार दिवंगत जी जी कदम यांचे सुपुत्र व भाजपचे नेते अमित कदम हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत अमित कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश राजकीय भूकंप मानला जात आहे. मेढ्यामध्ये अजित पवार यांच्या शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून अजित पवार यांच्या सभेची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
अमित कदम यांचा प्रवेश भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी मानली जात आहे. जावळी तालुक्याचे नेत्रुत्व शशिंकांत शिंदे यांच्याकडे असताना मेढ्यातील विविध विकासकामाच्या उदघाटनाला अजित पवार यांना बोलावण्यात आले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले.
२०१९ मध्ये शिवेंद्रराजेनी कमळ हाती घेतल्यानतंर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा मेढ्यात घेतल्याने अमित कदम यांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी दमदार एन्ट्री महत्वाची मानली जात आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बॅनरबाजीने मेढ्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौक बहरुन गेला आहे.