पिंपरी- मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि. 6) दुपारी साडेचार वाजता उर्से टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला. कारचा वाहन चालक धर्मेंद्र कुमार, अंकेश कुमार सालेन, माऊली बाळासाहेब कुंजीर, शीया सरण साकेत अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याला येणाऱ्या लेनवर एक अवजड ट्रक (के ए 35/सी 9974) चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबला होता. ट्रक रस्त्याच्या बाजूला पार्क करून चालक लघुशंकेसाठी गेला होता. या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या एका कारने (एम एच 14/ यू एन 4137) पाठीमागून जोरात धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचेही मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच द्रुतगती मार्गावरील देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांच्या मदतीने कार मधील चौघांना बाहेर काढण्यात आले. मागील दोन आठवड्यांपूर्वी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अशाच प्रकारचे दोन भीषण अपघात झाले होते. एका अपघातात भरधाव कार ट्रकच्या पाठीमागील बाजूने आत मध्ये घुसली होती.
तर दुसऱ्या अपघातात एका कार मध्ये लोखंडी डिव्हाइडर घुसला होता. दोन्ही अपघातात कारमधील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आज घडलेल्या अपघातांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या अपघातांची मालिका वाढू लागली आहे.