पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वर शहरात घाबरुन आलेले भेकर वन विभागाने सुरक्षित रित्या राखीव वन क्षेत्रात सोडली. सेठ गंगाधर माखरिया शाळेनजीक आठवडे बाजारच्या गर्दीमधून वाट काढत कुत्रा पाठलाग करीत असलेले एक भेकर आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत आले. भेकर वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या दिशेने पोलीस परेड मैदानानजीक असलेल्या नवीन कोर्टाजवळ घाबरून लोखंडी पत्र्याचा आडोसा घेऊन लपून बसले.
त्याच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. याबाबतची माहिती वन विभागास स्थानिक नागरिकांनी दिली. वन विभागाच्या वनरक्षकांनी या भेकरास सुरक्षित पकडून उपचारासाठी वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर या भेकरास सुरक्षित राखीव वन क्षेत्रामध्ये सोडून देण्यात आले.
हे जखमी भेकर पकडण्यासाठी वनरक्षक रोहित लोहार, लहू राऊत, अभिनंदन सावंत, सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, देवेंद्र परदेशी आदींसह वनमजूर अरुण केळगने, संतोष काळे, गणेश वाघदरे, निलेश, प्रथमेश यादव, विशाल जाधव, जितू भिलारे आदींनी परिश्रम घेतले.