मुंबई – विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याची बैठक बोलविण्यात आली आहे. मंगळवारी अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर “राष्ट्रवादी’च्या गोटात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह आमदार अनिल पाटील देखील उपस्थित आहेत. अजित पवारांच्या घरी बैठक झाल्याने चर्चांना उधान आले आहे.
पवारांनी मंगळवारी अखेर माध्यमांसमोर येत त्यांच्या बंडखोरीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तुम्हाला बॉंडपेपरवर लिहून द्यावे लागेल का? असा प्रश्न त्यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला होता. तसेच जीवात जीव असेपर्यंत पक्षासाठी काम करत राहणार असल्याचेही स्पष्टपणे त्यांनी सांगतले होते.
राज्यातील सोळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्द्यांसह सत्तांतराच्या मुद्द्यावर सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली आहे. या प्रकरणी निकाल कधीही येऊ शकतो. निर्णय जर शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात लागला तर राज्यातील सरकारला धक्का पोहचू नये यासाठी भाजपने प्लॅन “बी’ची तयारी केली आहे.
त्यातच जर ठाकरे गटाविरोधात निकाल गेला तर राष्ट्रवादीसमोर पर्याय काय? हा मुद्दा आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षात पर्यायाने अजित पवार यांच्यात काहीतरी शिजतेय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तशा चर्चाही होत आहेत.