मुंबई – काही दिवसांपूर्वी, शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे ‘पाकिस्तानशी संबंध असून, त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले’ असल्याचं खळबळजनक आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले होते की, “अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
तसेच त्यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते देखील आहे. यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून, सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या सर्व प्रकरणावर अखेर मौन सोडले असून त्यांनी भाऊसाहेब शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल आहे. नुकतंच दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारले असल्याचा आरोपावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्या म्हणाल्या. ‘महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा मी करू नये म्हणून माझ्या बदनामीच षडयंत्र रचले जात आहे. माझे फोटो मॉर्फ करून पाकिस्तानशी संबंध दाखवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझी बदनामी करण्यामागे राजकीय शक्ती असल्याचा मला संशय आहे.
मी शिवसेनेचीच आहे शिवसेनेतच आहे त्यामुळे माझ्या प्रवेशाचा प्रश्न येत नाही. एक दिवसात ते तिथे जाऊन येऊ शकतात तर काहीही होऊ शकतं, ही राजकारणाची खेळी आहे. इथे प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत आहे.” असं देखील दीपाली सय्यद यावेळी म्हणाल्या.