डेहराडून – उत्तराखंडमधील हल्द्वानी कारागृहामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हल्द्वानी येथील कारागृहातील 44 कैदी हे एचआयव्ही संक्रमित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व कैद्यांवर हल्द्वानी येथील सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हल्द्वानी कारागृहात एचआयव्ही बाधित कैद्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात आढळून आलेले एचआयव्ही बाधित कैदी हे ड्रग्ज व्यसनी आहेत. सध्या स्थितीत हल्द्वानी कारागृहात 1629 पुरुष आणि 70 महिला कैदी आहेत.
दरम्यान, यातील 44 कैदी हे एचआयव्ही संक्रमित कैदी आढळल्याने कारागृह प्रशासने कैद्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे एचआयव्ही संक्रमित आढळलेल्या कैद्यांवर योग्य वेळी उपचार करणे शक्य होईल. एचआयव्ही संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआरटी सेंटर तयार करण्यात आल्याची माहिती सुशीला तिवारी हॉस्पिटलचे डॉ. परमजीत सिंह यांनी दिली आहे.
कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह
सध्या कारागृहातील कैद्यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. एचआयव्ही संक्रमित रुग्णांवर निशुल्क उपचार करण्यात येत आहे. यासाठी एक विशेष टीम कार्यरत आहे. परंतू कारागृह अधिक्षक प्रमोद कुमार पांडे यांनी या घटनेबद्दल काही बोलण्यास नकार दिला आहे.
अशातच या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. एचआयव्हीचे संक्रमण हे एकमेकांपासून होते. त्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली असली तरी, कारागृह प्रशासन या घटनेनंतर सतर्क झाल्याचे माहिती देण्यात आली आहे.