Rohit Pawar : तरुणांचे, बेरोजगारीचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )यांची युवा संघर्ष यात्रा ( yuva sangharsh yatra ) निघाली होती. पुण्याहून नागपूरपर्यंत ही यात्रा दाखल झाली असून, नागपुरात विधान भवनाजवळ धडकली आहे. रोहित पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते परिसरात आहेत. मात्र, आता त्यांची ही यात्रा नागपूर पोलिसांनी अडवली आहे.
पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. पण कार्यकर्त्यांकडून बॅरिकेट्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकावर पोहोचला होता. यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. तर पोलीसही सतर्क झाले आहेत. पोलिसांनी रोहित पवार यांना अडवलं आहे. त्यानंतर रोहित पवारांना पोलिसांनी उचलून पोलीस व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, आता या सर्व राडेबाजीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. MPSC परीक्षेसंदर्भात प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत.
पण या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवार म्हणाले. एखाद्या आमदाराचे जर कुणी ऐकत नसेल तर सामान्य माणसाचे कुणी ऐकणार? हे सरकार भित्रं आहे. या सरकारला अहंकार आहे. असं रोहित पवार यावेळी म्हणाले.