हॉलीवूडमधील प्रेमप्रकरणांची चर्चा जगभरात होत असते. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकदा तारे-तारका एकाशीच लॉयल राहण्याचे ठरवत असतात, पण हॉलीवूडमध्ये कदाचित असे ठरवतच नाहीत की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते.
कारण तिथे जवळपास सर्वच कलाकारांचे एकाहून अधिक अफेअर्स असतात. कित्येकदा तर असे होते की एक अफेअर सुरू असतानाच दुसरे जुळते. पण या “दुसऱ्या’मुळे पहिले फिस्कटते आणि कालांतराने दुसरेही मोडते…!! अशीच स्थिती सध्या हॉलीवूडचा कलाकार ब्रॅडली कूपर याची झाली आहे. 2017 मध्ये आलेल्या “अ स्टार इज बोर्न’ या चित्रपटापासूनच लेडी गागासोबत ब्रॅडलीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा हॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये रंगू लागली होती.
त्यावेळी त्याने आपली आधीची प्रेयसी एरिना शायकशी ब्रेकअप करून लेडी गागासोबत संसार थाटण्याचे ठरवले होते, पण दीर्घकाळ त्यांचे अफेअरच सुरू राहिले. लेडी गागाने त्याच्यासोबत संसार थाटलाच नाही. विशेष म्हणजे आता तिने लिया पार्कर कंपनीचा सीईओ मायकल पोलान्स्कीसोबत रिलेशन जोडले आहे. नुकताच याचा उलगडा सोशल मीडियावर झाला. मायकेलसोबतचे रोमॅंटिक फोटो लेडी गागाने सोशल मीडियावर टाकले आणि त्यांच्यात काही तरी शिजतंय हे जगजाहीर झालं.
साहजिकच या फोटोंमुळे ब्रॅडलीची काय अवस्था झाली असेल ते वेगळं सांगायला नको! बिचारा ब्रॅडली! लेडी गागाने घातलेल्या मोहिनीला भुलून त्याने आपली आधीची प्रेयसीही गमावली आणि आता गागाही गेली! त्यामुळे बिचाऱ्यावर चल अकेला. चल अकेला. म्हणण्याची वेळ आली आहे.