Gram Panchayat Election – मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) राज्यभर विविध प्रकारची आंदोलने सुरू असून याचा ग्रामपंचायत निवडणुकीलाही (Gram Panchayat Elections) फटका बसताना दिसून येत आहे.
परभणीतील (Parbhani) वझुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Elections) आणि संरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या गावची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंच आणि 11 ग्राम पंचायत सदस्य अशा 12 जागांसाठी या निवडणुकीत एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन अर्ज सरपंच, तर 31 ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अर्ज होते.
मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक नाही, असा निर्धार करत सर्वच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले.
दुसरीकडे पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होती. तिथेही चार जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मात्र या चारही जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणूक होणार नाही असा निर्धार या गावकऱ्यांनी केला. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणच्या निवडणूक आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे.