मुष्टियुद्ध खेळाडू पूजाराणीचा विश्वास
नवी दिल्ली – करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जरी एक वर्ष पुढे गेली असली तरीही त्या स्पर्धेत सरस खेळ करून देशाला पदक जिंकून देणार, असा विश्वास भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू पूजाराणी हिने व्यक्त केला आहे.
मूळ वेळापत्रकानुसार यंदाच्या वर्षी ही स्पर्धा होणार होती. मात्र, करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत गेल्याने आयोजकांनी ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली. अर्थात संपूर्ण जगभर करोनाचा धोका वाढल्यामुळे अनेक स्पर्धा रद्द तर झाल्याच, पण त्याहीबरोबर लॉकडाऊनमुळे खेळाडूंना आपापल्या घरातच राहावे लागत होते. पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही सवलती देताना सरकारने देशातील मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्याची परवानगी दिली व पूजाच नाही तर सर्व खेळाडूंना सरावाची संधी मिळाली. यामुळे वैयक्तिक पातळीवर हा सराव क्रिकेटपटू वगळता अन्य क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंनी सुरू केला आहे. अशाच वैयक्तिक सरावाची संधी पूजाराणीलादेखील मिळाली असून रोज दोन सत्रात सराव केल्यानंतर एका सोशल चॅटवर बोलताना तीने टोकियोत पदक मिळवणारच, असा विश्वास व्यक्त केला.
करोनामुळे स्पर्धा लांबणीवर गेल्याने सुरुवातीला थोडी निराश झाले होते. तसेच सराव करण्यासाठी परवानगी कधी मिळणार हादेखील प्रश्न पडला होता. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने देशातील काही भागात आजही खेळाडूंना सराव करता येत नसल्याने आगामी स्पर्धांसाठी तयारी कशी करायची याचीही चिंता होती. मात्र, सरकारने पाचव्या लॉकडाऊमध्ये सवलती दिल्याने खूप आनंद झाला. आता या स्पर्धेला जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी असल्याने सराव मनाप्रमाणे करता येणार आहे. तसेच या मधल्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या स्पर्धा होतील त्यात सहभागी होत ऑलिम्पिकच्या तयारीसाठी खूप लाभ होणार आहे, असेही पूजाराणीने सांगितले.
75 किलो गटात मिडलवेट विभागात खेळत असलेल्या पूजाराणीने आशियाई स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले होते तेव्हापासूनच तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्याही अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने पहिल्या फेरीत विजय मिळवताना धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला व तिचे आव्हान संपुष्टात आले होते. आशियाई विजेतेपद स्पर्धेत मात्र तिने दबदबा राखताना प्रत्येकी एक सुवर्ण, रजत व ब्रॉंझ अशी तीन पदके पटकावलेली आहेत. आता टोकियो ऑलिम्पिकमध्येही तिने पदक मिळवले तर ती भारताची सर्वात अव्वल खेळाडू सुपरमॉम मेरिकोमच्या पंक्तीत जाऊन बसेल.
आत्मपरीक्षण करणार….
रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरले तेव्हा खूप आनंद झाला होता. मात्र, दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने सगळा उत्साहच गेला होता. त्यानंतर कित्येक दिवस मला कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होत नव्हती. या निराशाजनक परिस्थितीतून व मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागला. या काळात मला प्रशिक्षकांसह माझ्या कुटुंबीयांनी मोलाची मदत केली. ते सगळे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळेच मी पुन्हा सगळी निराशा झटकून सरावात व्यस्त झाले व त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये सरस कामगिरी केली. आता सराव करताना माझ्या खेळातील कमकुवत दुवे कसे दूर होतील, याबाबत मेहनत घेणार असून आपल्या सुमार कामगिरीचे आत्मपरीक्षण करणार आहे, असेही पूजाराणीने स्पष्ट केले.