मुंबई: रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणतात, अशा शब्दात महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले.
महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोविडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला सर्कस असे संबोधतात, अशा आशयाचे ट्वीट करत मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी सोनू सूदचेही कौतुक केले. मी टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत. असा निशाणा राजनाथ सिंह यांनी साधला होता.