लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला. आज सकाळी ते महाराणी एलिझाबेथ (Britain’s Queen Elizabeth) द्वितीय यांची भेट घेण्यासाठी डाऊनिंग स्ट्रीट येथील आपल्या कार्यालयातून रवाना झाले. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतल्यानंतर नियोजित पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे अधिकृतपणे सोपवली जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली जावी, अशी विनंती जॉन्सन यांच्याकडून केली जाणे अपेक्षित आहे.
बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची आपली इच्छा दोन महिन्यांपूर्वीच व्यक्त केली होती. हुजूर पक्षाकडून नव्या नेत्याची निवड होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहण्याची विनंती महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी जॉन्सन यांना केली होती. नियोजित वेळापत्रकानुसार काल हुजूर पक्षाकडून नवीन पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांचे नाव जाहीर करण्यात आले. आता महाराणींच्या उपस्थितीत लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.
आपली कामगिरी आपण फत्ते केली…
डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना जॉन्सन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या धोरणांमुळे देशाला आर्थिक सामर्थ्य प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. आपले काम फत्ते करणाऱ्या एखाद्या रॅकेटप्रमाणे आपली कामगिरी होती. आता आपण हळूवारपणे वातावरणामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहोत आणि प्रशांत महासागराच्या एखाद्या कोपऱ्यात अलगद विसावणार आहोत, असेही जॉन्सन म्हणाले.
सत्ता हस्तांतरणाचा समारंभ यावेळी प्रथमच बकिंगहॅम पॅलेसच्या ऐवजी बालमोरल येथील राजघराण्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन निवासस्थानी होणार आहे. महाराणी एलिझाबेथ 96 वर्षांच्या असल्यामुळे त्यांच्या हातचालींना आता मर्यादा आल्या आहेत. त्यांच्या सोयीसाठी समारंभ लंडनऐवजी स्कॉटलंडमध्ये केला जाणार आहे.