Morne Morkel Resigned : एकदिवसीय विश्वचषक 2023 हा पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खूप वाईट गेला. स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर संघात खळबळ उडाली आहे. आता संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी राजीनामा दिला आहे. 9 साखळी सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकणारा पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम क्रिकेट बोर्डावरही दिसून आला.
अलीकडेच संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी राजीनामा दिला होता. आता संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षकाने राजीनामा दिला आहे. मॉर्केल हा दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आहे. भारताने आयोजित केलेल्या विश्वचषकात पाकिस्तानकडून अत्यंत खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. संघाच्या मुख्य वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या हरिस रौफने विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा देण्याचा लज्जास्पद विक्रम केला होता.
गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, “पीसीबी लवकरच मॉर्केलच्या रिप्लेसमेंटची घोषणा करेल. “आगामी काळात बाबर आझमचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पाकिस्तान संघाला 14 डिसेंबर 2023 पासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी 7 जानेवारी 2024 रोजी संपेल.”
Morne Morkel resigns as Pakistan bowling coach
Details here ⤵️ https://t.co/El3BgWVbjh
— PCB Media (@TheRealPCBMedia) November 13, 2023
स्पर्धेत पाकिस्तानची खूपच निराशाजनक कामगिरी…
पाकिस्तानने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा 81 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला होता. मात्र, त्यानंतर सलग चार सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पाक संघाला भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावं लागलं होते. यानंतर संघाने पुढच्या दोन सामन्यात बांगलादेश आणि न्यूझीलंडला पराभूत केले असले तरी अखेरच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला.