संगमनेर -तालुक्यातील पठारभागात पुन्हा एक नवा करोनाबाधित आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आंबीखालसाच्या माध्यमातून करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पठारभागासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदरच्या इसमाचा कोणताही पूर्वोतिहास नाही. त्यातच तो संक्रमित झाल्याचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने दिलेला असल्याने स्थानिक प्रशासनाने त्याचा नव्याने स्त्राव घेवून, तो तपासणीसाठी पाठवला आहे.
मागील 25 मे रोजी मुंबईतील घाटकोपर येथून पठारभागातील केळेवाडीत आलेल्या 32 वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र संबंधित व्यक्ती मुंबईतून आल्यापासूनच संस्थात्मक विलगीकरणात असल्याने त्याच्यापासून कोणालाही संक्रमण झाले नाही. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारही करण्यात आले. त्यातून ती व्यक्ती पूर्णतः बरी होवून घरीही परतल्याने तालुक्याचा पठारभाग एकप्रकारे कोराना मुक्त झाला होता.
मात्र करोनासारखी लक्षणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणावरुन रविवारी (दि.14) पठारभागातील आंबीखालसा येथील एक तरुण संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता.
सोमवारी ग्रामीण रुग्णालयामार्फत त्याचा स्त्राव घेवून तो तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आज सकाळी स्थानिक प्रशासनाला प्राप्त होवून त्याद्वारे आंबीखालसाचा ही व्यक्ती करोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणाचा आंबीखालसा गावात स्वतःचा व्यवसाय आहे. या व्यवसायातूनच त्याला करोनाचे संक्रमण झाल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. संबंधित इसम मागील 1 जूनपासून गावातून बाहेरच पडलेला नाही.
त्याला जर गावातील कोणाकडून संक्रमण झाले असते, तर अन्य एखादा रुग्णही समोर आला असता. मात्र प्रत्यक्षात असे काहीही न घडल्याने सदर खासगी अहवालाबाबत प्रशासकीय पातळीवर साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित इसमाचा आज सकाळी नव्याने स्त्राव घेतला गेला असून तो, जिल्हा रुग्णालयातील शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल उद्या (दि.17) प्राप्त होण्याची शक्यता आहे.