बुकी संजीव चावला लवकरच भारताच्या ताब्यात

लंडन : वॉन्टेड बुकी संजीव चावला लवकरच भारताच्या ताब्यात येणार आहे. ब्रिटनमधून त्याचे प्रत्यार्पण केले जाणार आहे. स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांकडून त्याला उद्याच (गुरूवार) दिल्ली पोलिसांच्या पथकाकडे सोपवले जाण्याची शक्‍यता आहे.

संपूर्ण क्रिकेट विश्‍वाला 2000 या वर्षातील मॅच-फिक्‍सिंग प्रकरणाने हादरवून टाकले. त्या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा 50 वर्षीय चावला भारतीय यंत्रणांच्या रडारवर आहे. त्या प्रकरणात दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार दिवंगत हॅन्सी क्रोनिए संशयाच्या धुक्‍यात सापडला होता. आता चावला भारताच्या ताब्यात आल्यानंतर मॅच-फिक्‍सिंग प्रकरणावर आणखी प्रकाश पडण्याची शक्‍यता आहे. चावला याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले आहे.

भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी त्याने मोठी धडपड केली. त्यासाठी त्याने ब्रिटनमधील न्यायालयांचे उंबरे झिजवले. मात्र, त्याला दिलासा मिळू शकला नाही. भारत आणि ब्रिटन यांच्यात 1992 मध्ये प्रत्यार्पणविषयक करार झाला.

त्यानंतर चावलाशी संबंधित घडामोड पहिले हाय-प्रोफाईल प्रकरण मानले जात आहे. चावला याचे गुन्हेगारी जगताशीही लागेबांधे असल्याचा संशय आहे. भारतात आणल्यावर त्याची रवानगी दिल्लीतील तिहार तुरूंगात होण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.