कराची – पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या कराची शहरातील रेल्वे स्थानकामध्ये घातपाती हल्ला घडवून आणण्याचा कट सिंध प्रांताच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने उधळून लावला आहे.
या रेल्वे स्थानकामध्ये ठेवण्यात आलेला एक टाईम बॉम्ब शोधून निकामी करण्यात आला आहे. दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे महासंचालक असाद रजा यांनी याबाबतची माहिती दिली.
शुक्रवारी पेशावर एक्सप्रेसमध्ये एका सीट खाली एक बेवारस बॅग असल्याचे आढळून आले होते. ही रेल्वे नुकतीच पेशावर येथून कराची कॅन्टोन्मेंट स्थानकामध्ये येऊन दाखल झाली होती.
या बॅगेमध्ये आयईडी डिव्हाईस, बॅटरी आणि जोडलेल्या वायरी असल्याचे आढळले होते. त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण केले गेले. त्यांनी दोन नियंत्रित स्फोट घडवून हा बॉम्ब नष्ट केला, असे त्यांनी सांगितले. या टाईम बॉम्बमध्ये किमान २ किलो स्फोटकांचा वापर केला गेला होता.