सिमला, दि. 8 -देशातील अनेक राज्यात प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या पासचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशात प्रवेश करण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या नावाने दोन बोगस ई पास काढण्यात आल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे.
या दोन्ही ई -पासवर एकच मोबाइल नंबर आणि एकच आधार कार्ड नंबर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सिमला पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीतांचा शोध जारी आहे.
जिल्हा प्रशासनाकडूनच बोगस ईपास तयार केले जात असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून प्रसारीत केल्या जात आहेत त्याचीही शहानिशा केली जात आहे. हिमाचलात प्रवेश करण्यासाठी 26 एप्रिलपासून ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. तथापि तेथे खोटी माहिती देऊन हे पास काढले जात आहेत त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याची बाब उघड झाली आहे.