द्वारका – भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवभूमी द्वारकेतही करोनामुळे एका कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. द्वारकेतल्या एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे करोनाने निधन झाले, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली.
द्वारका येथील रहिवासी जयेश भाई जैन नाश्त्याचे दुकान चालवत होते. करोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर गुरूवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा निधनाची बातमी समोर आली, तेव्हा संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जयेश भाईचा अंत्यसंस्कार करून त्यांची पत्नी साधना बेन आणि दोन मुले कमलेश आणि दुर्गेश जैन यांनीही आत्महत्या केली. या तिघांनीही विष प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात येत आहे.
दूध टाकणारी व्यक्ती जेव्हा घरी आली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. दूधवाल्याला घराचा दरवाजा उघडलेला आढळला. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. त्यानंतर लगेच ही माहिती पोलिसांना देण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच सामूहिक आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. देवभूमी द्वारका येथील या घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय.