गराडे, (वार्ताहर)- पुरंदर तालुक्यातील बोबगावचे श्रीक्षेत्र कानिफनाथ गड मंदिर बोपगाव परीसरातील वनविभाग अंतर्गत वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण होत असताना नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टच्या वतीने पाणवठे भरून वन्यप्राण्यांना काही प्रमाणात दिलासा देऊन त्यांच्या संरक्षण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून सामाजिक वसा जपण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
सध्या पुरंदर तालुक्यात दुष्काळ पडलेला असून बऱ्याच गावांना टँकरद्वारे पाणी पिण्यासाठी पुरवठा होत असून पिण्याच्या पाण्यासाठी वनवण फिरावे लागत आहे. चाऱ्याचाही व पाण्याचाही प्रश्न बिकट झाला आहे. अशावेळी वन्य प्राणी व पक्ष्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. यासाठीच नवनाथ देवस्थान पंच कमिटी कानिफनाथ देवस्थानाच्या वतीने उपाध्यक्ष दीपक फडतरे, विश्वस्त सुनील फडतरे,
व्यवस्थापक संतोष गोफणे, प्रकाश फडतरे, फाॅरेस्ट अधिकारी नानासाहेब घाटे व कर्मचारी यांच्या वतीने पाणवठे भरून देण्याचे व वन्यजीव वाचवण्याचे काम करत आहेत. या संदर्भात सासवड विभागीय अधिकारी विशाल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झालेले असून त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सासवड क्षेत्रात पानस्थळची संख्या 46 असून गावे 28 आहेत. सर्वच ठिकाणी आम्ही पाणी पोहोचवू शकत नसून सार्वजनिक संस्थांमार्फत बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. काही पाणवठे गळत असून त्यांची दुरुस्ती करावी लागेल तर बऱ्याच ठिकाणी पाणवठे भरण्यासाठी नागरिक मदत करीत आहेत.