येरवडा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतु समोरील चौकात काही “माननीयांनी’ उत्साहाच्याभरात कोणत्याही प्रशासनाची परवानगी न घेताच “वेलकम येरवडा’, “माझा येरवडा माझा अभिमान’, असे विद्युत रोषणाईचे बोर्ड बसविले आहेत. हे बोर्ड अनधिकृतपणे बसविण्यात आल्याची तक्रार नागरिकांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते एजाज खान यांनी आयुक्तांकडे केली आहे. मूलभूत समस्या कायम असताना निधीचा गैरवापर होत असल्याच्या विरोधात नागरिकांनीही येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
येरवडा प्रभाग क्र.6च्या नगरसेविका गटनेत्या अश्विनी लांडगे यांनी “वेलकम येरवडा’, असा तर नगरसेवक संजय भोसले यांनी “माझा येरवडा, माझा अभिमान’, असा बोर्ड लावला आहे. मात्र, हा फलक लावण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. या कामाची निविदा तसेच वर्क ऑर्डरही काढलेली नाही. क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडूनही निविदा अथवा विद्युत जोडणी दिली नसल्याचे विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता निलेश कालेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रभागात अनेक कामे निधी अभावी अपुर्ण आहेत, ती पूर्ण करण्यावर खर्च करण्याएवजी सुशोभिकरणाच्या कामावर निधी खर्च केला जात असल्याने नागरिक संताप व्यक्त केला आहे.
क्षेत्रीय कार्यालयामार्फत हे काम झालेले नाही. याबद्दल कसलीच माहिती क्षेत्रीय कार्यालयाला नाही. वरिष्ठांशी चर्चा करून वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल.
– महेंद्र बहिरम, उपभियंता, येरवडा क्षेत्रीय कार्यालय
नगरसेवकांच्या निधीतून हे काम केले असून असे काम करता येते. रस्ते विकासकामे करण्यासाठी निधीची तरतूद केलेली असते, त्यातुनच ठेकेदाराला सांगुन हा बोर्ड बसविण्याचा खर्च केला आहे. शहरात अनेक ठिकाणी असे बोर्ड लावले असल्याने असा बोर्ड ठेकेदारामार्फत लावलेला आहे.
– अश्विनी डॅनियल लांडगे, गटनेता, नगरसेविका एमआयएम
शहरात अनेक ठिकाणी असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर येरवड्यातही असे बोर्ड बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाइपलाइनवर हा बोर्ड बसविलेला नाही. यासाठी नगरसेवक निधीतून तरतूद करण्यात आलेली आहे. कुठलाही अनावश्यक निधीतून खर्च केलेला नाही.
– संजय भोसले, नगरसेवक, शिवसेना,