पुणे -(व्यंकटेश भोळा) विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश, उच्च शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून आता पुणे विभागातील अनुदानित सर्व वरिष्ठ महाविद्यालयांची नॅक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालयात नॅक मूल्यांकन करून घेण्यात पुणे विभागीय उच्च शिक्षण विभाग सर्वात पुढे असल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्व महाविद्यालयांना मूल्यांकन करून घेण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यात उच्च शिक्षण विभागाकडून सातत्याने महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच पुणे, नगर आणि नाशिक कार्यक्षेत्र असलेल्या पुणे विभागातील महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांकडून मार्गदर्शकाची भूमिका बजावली जात आहे. त्यामुळे पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागात एकूण 168 पैकी 166 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. यातील एक महाविद्यालयाची नॅक मूल्यांकन अंतिम टप्प्यात असून, दुसऱ्या महाविद्यायलाची नॅक मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यात सर्वच महाविद्यालयांची नॅक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात एकूण 1 हजार 177 अनुदानित महाविद्यालये आहेत. केवळ अनुदानितच नाही तर विना अनुदानित महाविद्यालयांनाही नॅक मूल्यांकन करणे आवश्यक आहे, असे यूजीसीचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने 8 ऑक्टोबर 2010 रोजी याबाबतचा अध्यादेशही प्रसिद्ध केला होता. मात्र, तरीही राज्यातील 98 महाविद्यालयांनी एकदाही नॅककडून मुल्यांकन करून घेतले नसल्याचे समोर आले आहे. त्यात अमरावती विभागातील महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक 19 एवढी असून त्या खालोखाल नागपूर विभागातील 14, नांदेडमधील 12, औरंगाबाद विभागातील 11 महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुदत दिली आहे.
पुणे विभागात दोन महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन केलेले नव्हते. यातील एका महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन अंतिम टप्प्यात असून, आणखी एका महाविद्यालयाची मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांत पुणे विभागातील सर्व महाविद्यालये नॅक मूल्यांकन करून घेण्याकडे वाटचाल सुरू असून, त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे.
– डॉ. किरणकुमार बोंदर, सहसंचालक, पुणे विभाग उच्च शिक्षण