मुंबई :- मुंबई महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर कंत्राट अखेर रद्द करण्यात आले आहे. यात तब्बल 263 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. तसेच हा मुद्दा अधिवेशानामध्ये मांडला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आज अखेर हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.
मुंबई शहराच्या सुशोभिकरणासाठी बाक, कुंड्या खरेदी करण्याची निविदा काढण्यात आली होती. मात्र यात घोटाळा झाला असून त्या विरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. तसेच आदित्य ठाकरेंनी आज राज्यपालांना बीएमसीच्या रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्याच्या विशिष्ट मागण्यांसह पत्र लिहिले आहे. घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
काय आहे कथित घोटाळा?
स्ट्रीट फर्निचर कंत्राटामध्ये रस्त्यावरील फर्निचरमधील वस्तू खरेदी करण्यासंदर्भात जानेवारी 2023 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एकूण 13 वस्तूंचा समावेश होता. या 13 वस्तू एकाच कंत्राटदाराने पुरवाव्यात अशी अट होती. यामुळे निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांची यादी येथेच कमी झाली होती. तरीही दोन कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये या दोन्ही कंपन्यांना स्ट्रीट फर्निचरचा पुरवठा करण्याचा कुठलाही अनुभव नसल्याचा आरोप आहे.
कंत्राटामध्ये डिपॉझिट रक्कम 5 कोटी देण्याची अट होती. या स्ट्रीट फर्निचरमध्ये कुंड्या आणि बेंच खरेदीवर भर देण्यात आला होता. बेंच नगरसेवक यांच्या फंडातून खरेदी केले जातात, मग अधिकच्या बेंचेसची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.