Shashank Ketkar : मराठमोळा अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो अनेकदा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. विविध मुद्यांवर तो मत व्यक्त करताना दिसतो. नुकतेच शशांक एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे मुंबईतील अस्वच्छता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुंबईतील रस्त्यालगत ठेवल्या जाणाऱ्या कचरापेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक कचरापेटी ठेवलेली दिसत असून, तिच्या आजुबाजूला कचरा अक्षरश: ओसंडून वाहतो आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत शशांकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिल्या आहेत, तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचऱ्याच्या २ पेट्या ठेवल्या आहेत! आपण सगळे एकत्र मिळून बदल घडवू शकतो! पण कधी? हा बदल घडवण्याची आपली खरंच इच्छा आहे का?” असा सवाल त्याने यातून उपस्थित केला आहे. शशांकने ही पोस्ट मुंबई महानगरपालिकेला टॅग केले आहे.
या पोस्टपुढे त्याने सत्य परिस्थिती, प्रदूषण, हे नाही चालणार, ये नही चलेगा असे हॅशटॅग दिले आहेत. दरम्यान, शशांक केतकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी आपली मतं मांडली आहेत. ‘मला वाटतं की, आपला कचरा आपण कचराकुंडीत टाकावा, ही सर्वस्वी आपली जबाबदारी नाही का?’, ‘शशांक तुझं म्हणणं अगदी योग्य आहे’, ‘ देशभरात अशी परिस्थिती आहे,’ अशा कमेंट्स अनेकांनी शशांकच्या पोस्टवर केल्या आहेत.