Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोग सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या कामाबाबतच्या काही अपडेट तो चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करतो. परंतु काही दिवसांपूर्वी त्याने शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी घराघरात जाऊन मराठा जातीय सर्वेक्षण केले जात आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. पुष्कर जोगच्या घरीदेखील बीएमसीमधील महिला कर्मचारी गेली असताना त्यांनी त्याला जात विचारली. याच कारणामुळे पुष्कर जोगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
पुष्कर जोगची पोस्ट ?
“काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील,” अशी पोस्ट त्याने केली होती. मात्र पुष्करच्या या पोस्टमुळे वाद झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पुष्कर जोगवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.
पुष्करने व्यक्त केली दिलगिरी
परंतु या पोस्टनंतर वाद झाल्यानंतर आता पुष्करने दिलगिरी व्यक्त केली आहे. “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” अशी पोस्ट त्याने केली आहे.
दरम्यान, पुष्कर जोग लवकरच ‘मुसाफिरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही पुष्कर जोगने केले आहे. येत्या २ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.